गाडीवाटेने जाताना दिसणारा सिंहगड इतिहासातील एक पुरातन किल्ला सिंहगड पुण्याजवळील एक दिवसीय सहलीचे ठिकाण सिंहगड श्री तानाजी मालुसऱ्...

घर कि मुर्गी दाल बराबर: सिंहगड

गाडीवाटेने जाताना दिसणारा सिंहगड



इतिहासातील एक पुरातन किल्ला सिंहगड
पुण्याजवळील एक दिवसीय सहलीचे ठिकाण सिंहगड

श्री तानाजी मालुसऱ्यांच्या बलिदानाने पावन झालेला सिंहगड
चविष्ट खेकडा कांदाभजी आणि दही ताक मिळण्याचे ठिकाण सिंहगड

हिंदुपतपादशाहीतील महत्वाचा किल्ला सिंहगड
Weekend ला फिरायला जाण्याचे ठिकाण सिंहगड

सिंहगड या वर काय लिहिणार? नेहमी तर जातेस नवीन काय आहे तिथे...
थोडक्यात काय तर घर कि मुर्गी दाल बराबर... पण आहे ना बाबा... बघायला अनुभवायला हि खूप आहे... चविष्ट खेकडा कांदाभजी आणि दही ताक तर आहेच पण दूरवर दिसणारे राजगड तोरणा... हवामान अगदी चांगले असेल तर अगदी तुंग तिकोना, पुरंदर रुद्रमाळ... बाहू स्फुरण पावतील अश्या मावळ्यांच्या शौर्यगाथा... आणि आधुनिक मानवांनी केलेला कचरा, त्यातल्याच काहींची तो साफ करण्यासाठी चाललेली धडपड. हिमालयात निघालेल्यांची फिटनेस साठी चाललेले प्रयत्न. रोज (हल्ली वीकेंडला) गडावर दही ताक विकणाऱ्या मावश्या आणि अजुन खूप काही...               

संध्याकाळी दिसणारे राजगड तोरणा
कालानुरूप बदलत गेलेली ओळख घेऊन अजूनही ताठ मानेने, दिलदार मनाने सगळ्यांचे स्वागत करतोय हा किल्ला. पुणे शहरापासुन फक्त २५ किलोमीटर वर नैऋत्य दिशेला भुलेश्वर रांगेमधला हा किल्ला किती पुरातन आहे त्याचा अंदाज काही नुसता जाऊन येत नाही. कौंडिण्य ऋषींच्या तप करण्याचे ठिकाण असावे म्हणून कोंढाणा नाव पडले असा कयास. इतिहासातील नोंदी १४व्या शतकापासुनच्या आहेत. इसवी सन १८१८ पर्यंत अनेक हस्तान्तरे पाहिली याने.

श्री शिव छत्रपतींनी आधी श्री शहाजी राजांच्या सुटके साठी व नंतर इसवी सन १६६५ मध्ये पुरंदरच्या  तहामध्ये हा महत्वाचा किल्ला गमावला. आणि इसवी सन १६७० मध्ये  श्री तानाजी मालुसऱ्यानी बलिदान देऊन हा किल्ला स्वराज्यात आणला. मधल्या काळात किल्ला औरंगजेब आणि मराठे यांच्यात हस्तांतरीत होत राहिला आणि इसवी सन १७७० मध्ये  श्री राजाराम छत्रपतींनी येथेच देह ठेवला. १७०३ मध्ये औरंगजेबाने किल्ला जिंकून नाव ठेवले बक्षींदाबक्ष! पुढे मराठे, मुघल आणि निजाम यांच्या या किल्ल्यावर लढाया होत राहिल्या. १८१८ मध्ये जनरल प्रिझलर ने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकुन घेतला. ब्रिटिश राज काळात लोकमान्य टिळक व अन्य प्रभृतींनी येथे वास्तव्य केल्याच्या नोंदी आहेत.   

पुण्यात राहणाऱ्यांकडे कोणी पाहुणे आले कि त्यांना ऑथेंटिक मटका दही आणि खेकडा भजी खाऊ घालायला गाडी पुणे खडकवासला गोळेवाडी मार्गे येते सिंहगडावर. गोळेवाडी ते सिंहगड वाहनतळ असा सुमारे ९ किमी चा घाट पार करून आपण वर पोचतो ते खांदकड्याच्या खाली नवीनच बांधलेल्या वाहनतळावर. आजुबाजुला गडकऱ्यांनी बांधलेली झोपडी कम हॉटेल्स आहेत. या घाटात एक वाट खेड शिवापूरच्या जवळ कोंढणपुर ला उतरते.    

पुणे दरवाजा क्रमांक २
पाहुणे थोडे उत्साही असतील तर आतकरवाडीतून किल्ला चढत येतात. या वाटेने येताना मध्ये एका मेटावर काळूबाईचे स्थान आहे. हि वाट पोचते पुणे दरवाज्याजवळ असलेल्या पायऱ्यांजवळ. उजवीकडे पायऱ्या आणि पुणे दरवाजा कि डावीकडे वाहनतळ अश्या चक्रात ना पडता आपण आपले ३ दरवाजे ओलांडून वर जायचे. उजवीकडे दिसते ते दारुगोळ्याचे कोठार कि ब्रिटिश कालीन चर्च... आणि डावीकडे खांब असलेली खोदीव गुहा जी कदाचित पागा म्हणुन वापरली गेली असावी. आपण आपले पदपथावरून चालत राहायचे मग एक वाट डावीकडे वळते तिकडे जायचे. मग चालू होते गडाच्या कड्यावरून जी वाट - पूर्वी अत्यंत बिकट असावी असा मनात विचार सुद्धा येणार नाही अशी बांधलेली आणि कोणी खाली पडू नये म्हणून कठड्यानी सजवलेली. या कड्यावरून खाली कल्याण, कोंढणपूर गावे आणि उजवीकडे गडाच्या पोटात असलेला कल्याण दरवाजा. मान ताठ केली तर समोर राजगड आणि तशीच उजवीकडे नजर वळवली कि तोरणा... तसा हे किल्ले ओळखायला फार अभ्यास करावा लागत नाही. असच डावी कडे पाहिले कि दूरदर्शन चा मनोरा. आता उजवी वळायचे आणि चालू पडायचे. थोडे अंतर गेल्यावर एक वाट डावीकडे खाली उतरते आणि जाते कल्याण दरवाजाकडे. एकापाठोपाठ एक अशी रचना आहे. वाट पुढे कोंढणपुरला  जाते हे लक्षात ठेवायचे आणि आणि गुमान मागे फिरायचे. दरवाज्यावर एक कोरीव हत्ती दिसतो, एक देवनागरी शिलालेख आहे. 

थोडे वर येऊन, आलो त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे मावळतीला चालु पडायचे.  इथे दिसतो तो झुंजार बुरुज. आणि खाली असलेले कळकी मेट. इथे देखील एक दिंडी आहे. करायची थोडी शोधाशोध, सापडते लगेच.

खेकडा भजी
इथून पुढे चालु लागलो कि तटबंदी वरून जाणारी उंच सखल वाट घेऊन जाते विंडपॉइंट उर्फ तानाजी कडा उर्फ डोणागिरीच्या कड्यावर. तानाजीराव इथुनच रात्रीच्या अंधारात चढुन आले होते स्वतःचा जीव पणाला लाऊन एक वेडे स्वप्न पुरे करायला. आपल्याला काय त्याचे! आपण आपली पिकनिक चालु ठेवायची आणि विंडपॉइंट चा वारा खाऊन आणि सरबत पियुन पुढे निघायचे. कलावंतिणीच्या बुरुजाजवळ म. रा. प. वि. मं. ने एक प्रेक्षागृह आणि काहीबाही बांधले आहे. त्या कडे फार लक्ष ना देता पुढे बंगले दिसतात तिकडे जायचे. अचानक एक रस्ता डावीकडे उंचावर जायला लागतो, जायचे ना मग तिकडेच. श्री कोंढाणेश्वराचे मंदिर, किल्ल्यावरील सर्वात उंच पॉईंट - किल्लेदाराचा वाडा आणि पुढे तानाजीरावांचे स्मारक वगैरे बघुन आपण पोचतो ते एका पठारावर. इथे बरीच हॉटेल्स आहेत, आपण आपली पिठले भाकरी ओरपायची आणि पाणी कुठून आले असेल याचा विचार न करता हल्ली ऊन खूपच आहे असे म्हणत पडी घ्यायची. फारच उत्सुकता वाटली तर १२ महिने २४ तास अविरत पाणी पुरवणारे देवटाके बघुन घ्यायचे.
 
तानाजी मालुसरे स्मारक
 तानाजी स्मारक समितीने काही काळापूर्वी या स्मारकाची निर्मिती केली. हरसाल माघ वद्य नवमी ला येथे स्मृती समारंभ केला जातो. याच्या जवळच तानाजीच्या विरुद्ध लढणाऱ्या मुगल अधिकारी उदेभानु चे देखील स्मारक आहे.   

आलो त्याच चढणीवरून परत फिरलो कि डाव्या हाताला खाली श्री राजाराम छत्रपतींची समाधी बघायची. तिथल्या  टाक्यांमधली घाण कुणी तरी मुर्खाने केली म्हणून त्याला नाव ठेवायची, आपल्या हातातली संपलेली पाण्याची बाटली पण तिथेच टाकायची आणि आणि पुढे चालू पडायचे.

पुढे अचानक काही जुन्या प्रकारचे बैठे बंगले दिसतात. यातील एक आहे लोकमान्य टिळकांचा. अरेच्या! असेल काही तरी असं म्हणायचे आणि पुढे निघायचे.    

इथून एक वाट पुढे जाऊन पुणे दरवाजा क्रमांक ३ जवळ पोचते, त्या आधी तिथे डावीकडे शौचालये आहेत. फार अपेक्षा ना ठेवता जर गरज असेल तर लाभार्थींनी लाभ घ्यायचा. डावीकडे अफाट पसरलेलं पुणे शहर दिसते.


पिठले भाकरी
पूर्वापार चालत आलेल्या पद्धती नुसार आसपासचे गावकरी अजूनही दूध दही घेऊन विकायला येतात. जागोजागी विक्रय चालू असतो. संक्रांतीची सुगडी असतात तश्या मातीच्या छोट्या मडक्यांमध्ये हे दही लावलेले असते. गडावर बरेच जण पिठले भाकरी वगैरे बनवून देतात. बड्या हॉटेल्स मध्ये वाद न घालता असेल त्या किमतीत छटाक भर भाजी घेणारे इथे मात्र एक भाकरी आणि पिठले याचे ५० रुपये जास्त आहेत असा वाद घालताना नक्की दिसतील.  

मटका दही
तर इतिहासातील एक जीर्ण झालेले सोनेरी पान वगैरे काही विचार ना करता, स्वातंत्र्य, स्वराज्य वगैरे गोष्टींचा फार लोड ना घेता आपण आपले घरी परत निघायचे.

चढून आणि गडफेरी करून थकला असाल आणि गाडी नाही तरी फिकर नॉट. वाहनतळावर खाली जाणाऱ्या जीप / वडाप मिळून जातील फक्त योग्य तो मोबदला द्यावा हि त्यांची अपेक्षा.

गडावर एक तोफ आहे, पण हा उल्लेख सोडून इतर माहिती टाळली आहे कारण बरेच जण फोटोशूट साठी प्रॉप म्हणुन त्याचा वापर करतात. आणि बघायची असेल तर शोधा कि जरा स्वतःची स्वतः! 

आतकरवाडी मधुन एक वाट डोंगराच्या पोटात जाते, तिथे बरेच पक्षी दिसतात, त्यामुळे बरीच "पुण्य"वान मंडळी तेथे पक्षी निरीक्षणासाठी जातात.

खुप जण फिटनेस साठी, हिमालय मोहिमांच्या पुर्वतयारी साठी नियमित येत असतात. कात्रज ते सिंहगड (K2S)  हा एक लोकप्रिय ट्रेक आहे  तसेच सिंहगड पुण्याजवळ असल्यामुळे व कमी कष्टात गडमाथ्यापर्यंत पोहोचण्याच्या सोयीमुळे खूप वर्दळ असते त्यामुळे अतिशय कचरा होतो. कुठल्याही दुर्गम ठिकाणी पाळण्याचे नियम पाळले तर सहल / गिरिभ्रमण / गिर्यारोहण उर्फ ट्रेक सगळ्यांसाठीच सुखावह होऊ शकतो. निम्नोक्त काही नियम आहेत ते पाळणे गरजेचे आहे जेणे करून आपला हा जैवविविध्याचा आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढयांना सुद्धा अनुभवता येईल.