परवा फेसबुकवर प्रकाशच्या हॉटेलची जाहिरात टाकली आणि सुधीर दादा ने कंमेंट केली. त्यावर सगळेच तुटून पडल्यासारखे कॉमेंट करायला लागले.
यात दादाचा पहिला मुद्दा असा होता कि गडावर का नॉन व्हेज देताय. त्यावर माझे त्यांच्याशी बोलणे झाले, त्याचा सारांश असा:
"गडावर नॉन व्हेज अजिबात दिले जात नाही. खाली पाचनई किंवा खिरेश्वर मध्ये आधी सांगितले तर ते मिळते पण परत सणवार, यात्रेचे दिवस वगळून. हा माझा फर्स्ट हॅन्ड अनुभव आहे, फार जुना पण नाही अगदी या वर्षीचा फेब्रुवारी मधला. प्रकाशने गडावर देणार नाही असे ठामपणे सांगितले, खिरेश्वर मध्ये बाळू म्हणाला यात्रा तोंडावर आहे, घरी सामान येऊन पडले आहे, बाहेर शेतात देतो अगदीच हवे असेल तर." आम्ही घेतले नाही हा भाग निराळा.
यावर काही जणांचे म्हणणे असे पडले कि पुर्वी गडावर बनत नसेल का? तर त्याचे उत्तर असे आहे कि अगदीच बनत असेल, त्रास देणारे वाघ, रान डुकरे, तितर वगैरे जे काही सहज उपलब्ध होत असेल ते सगळे नक्कीच खाल्लं जात असणार. लॉजिक आहे, ऐतिहासिक पुरावा माझ्याकडे नाही. पण पण पण ...
पुर्वीची बहुतेक माणसे शहाणी होती, थोडक्यात समाधानी होती. पैशाच्या मागे लागून पिशाच्च नव्हती झालेली. त्यामुळे कुठे थांबायचे हे त्यांना निश्चित कळायचे. आज परिस्थिती तशी नाही. जिथे खातात तिथेच थुंकणारी (अजुन घाण बोलायचे आहे पण नको) लोकं आहेत. खाल्लेल्या गोष्ठींची विल्हेवाट कशी लावायची हे कळत नाही.
कोंबडी मारतानाची प्रोसेस काय असते ते माहित असते बहुतेक सगळ्यानाच, तिच्या पिसांचे, जो भाग खाल्ला जाऊ शकत नाही त्याची विल्हेवाट कशी लावावी? उडू द्यायची पिसे आणि मग विशालगणेशच्या सोंडेवर, केदारेश्वरच्या पिंडीवर बसू द्यायची? की जे रक्त वाहील त्याने हरिश्चंद्रेश्वराचा अभिषेक करायचा की वाहू द्यायचे सप्त तीर्थात?
मांस प्लास्टिक पिशवीतून नेले जाते, तिची विल्हेवाट कशी लावायची तर ती कड्यावरून खाली टाकायची. इथे मग तो हरिश्चंद्राचा कोकणकडा असो नाहीतर नाहीतर सिंहगडाचा डोणागिरी. जेवायला वापरणार स्टायरोफोमची ताटे आणि चहाला परत प्लास्टिकचे ग्लास. कारण स्टीलची ताटे उचलून आणणे आणि धुवायचे (इतरांचे) उष्टे काढायचे कष्ट करायचे कोणी? कारण येणाऱ्या "पर्यटकांना" गरजेपेक्षा जास्त घेणे आणि वाया घालवणे कळते कारण हे लोक पैसे मोजतात इतरांना बोलायचे काय कारण! ("मै पैसा दे रहा हुन, तुम कोन होती हो बोलने वाली" हे मी दर वेळी ऐकले आहे)
हीच पुर्वीची माणसे इतकी शहाणी होती कि बहुतेक किल्ल्यावर निरनिराळ्या कारणासाठी वापरण्याचे पाणी देखील वेगळे असायचे. (आज लोक बिनधास्त उष्ट्या बाटल्या बुडवून पाणी भरून घेतात.) याच लोकांना कचऱ्याचे व्यवस्थापन माहित होते. त्यामुळे जरी अशी शिकार झाली / केली कि त्यानंतर उरलेल्याची विल्हेवाट कशी लावायची हे माहित होते. आज जो हाडाचा किंवा मराठीमध्ये प्रो ट्रेकर असतो त्याला माहित असते याची विल्हेवाट कशी लावायची ते पण बहुतेक वेळा "पर्यटक" / नवशिके फारतर मिळेल त्या प्लास्टिक पिशवी मध्ये भरून बाजुला सारून ठेवतात. रात्री एखाद्या प्राण्याने या मांसाच्या वासामुळे हल्ला केला तर कसे वागावे याची सुद्धा शुद्ध नसते, इंस्टाग्राम लाईक्स कश्या मिळवायच्या याच्या ट्रैनिंग मध्ये त्याचे ट्रैनिंग झालेलेच नसते. त्यामुळे आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न आला कि गोंधळ उडणारच ना.
बरं फक्त नॉन व्हेज खातील तर कसे त्यासोबत दारू पाहिजेच ना. एखाद्या तळ्याकाठी छानश्या रिसॉर्ट मध्ये मंद प्रकाशात हळूच एखादा घोट चवीने पीत दारू प्यावी तर ते नाही. कोण जास्त पिईल याची स्पर्धा करायची आणि एखादी टाकी भरायची असल्यासारखी ढोसायची आणि कुठेतरी जाऊन भडाभडा ओकायचे काय तरी बाई यांची हौस. त्यात एखादी बाई दिसली तर मग सुटलाच संयम! जर अश्या बेधुंद लोकांनी गडावरच्या किंवा इतर पर्यटक मुलींवर काही अतिप्रसंग केला तर कोण जबाबदार? मी स्वतः असे काही नमुने दाखवू शकते जे अगदी रायगडावर मुलींना घेऊन गेलेत लग्नाआधी मधुचंद्राचा कार्यक्रम करायला! (नाव विचारायला येऊ नका)
दारूच्या अमलाखाली असलेल्या तिघांनी आंबोलीला काय केले हे लक्षात आहे की त्याची देखील एकदा उजळणी करायची आहे?
आज सिंहगड, पन्हाळा सारख्या ठिकाणी गाडी वरपर्यंत जाते तिथे काय परिस्थिती आहे हे मी काय वेगळे सांगायला हवे? use and throw अशी सवय लागल्यामुळे प्रचंड कचरा. आणि याला फक्त पर्यटक जबाबदार नाहीत स्थानिक देखील आहेत. आपल्या बाटल्या विकल्या जाव्यात म्हणुन राजगडावर असलेला अक्षय्य पाण्याचा स्रोत असलेले टाके चपला टाकून खराब केलेलं मी स्वतः पाहिलेय. याच स्थानिकांनी शाळेतल्या मुलांवर मधमाश्यांनी हल्ला केल्यावर जी बाटली खाली २० रुपयांना मिळते ती एरवी गडावर ४० रुपयांना विकली जाते आणि त्या दिवशी ८० रुपये हवेत म्हणून अडून राहिलेली पाहिलीत मी. अलंगच्या एका patch ला एक ग्रुप अडकला होता तेव्हा दहा हजार रुपये मागितले. अशीही गोष्ट पाहिली आहे मी. उद्या पैसे मिळत असतील तर अशी लोकं बाया का पुरवणार नाहीत? देऊ शकते का कोणी खात्री? हाताची सगळी बोटे सारखी नसतात हे मान्य आहे पण एकही बोट खराब झाले तर परिणाम सगळ्या हातावर होतो.
बर तुम्हाला खायचेय नॉन व्हेज तर घरी खा, गडाखाली मिळतेय तिथे खा गडावरच हवे हा हट्ट कशासाठी? हरिश्चंद्र असेल, आजचा सिंहगड किंवा कालचा कोंडाणा असेल, वासोटा पन्हाळा हे सगळे किल्ले एके काळी तपोभुमी होते. चांगदेव, कौंडिण्य ऋषी, वशिष्ठ ऋषींचे शिष्य अगस्ती ऋषी, साक्षात परशुराम यांनी पावन केलेला साल्हेर किंवा ब्रह्मदेवाने तपस्या केलेला पन्हाळगड हे आज मंदिरापेक्षा कमी मानले जाऊ शकत नाहीत. जर आपण मंदिरात मांसाहार करून जात नाही मग गडावर तरी का जावे?
(हरीशचंद्रगडावर मंदिरात एक गुहा आहे तिथे गडावर इतस्ततः पसरलेल्या काही मुर्ती उचलून आणून सुरक्षित रहाव्यात म्हणुन ठेवल्यात तिथला विडिओ, कृपया माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष करा)
Follow Us
Were this world an endless plain, and by sailing eastward we could for ever reach new distances