अवघ्या भटक्यांची पंढरी असलेल्या हरिशचंद्रगडला वर्षातुन एकदा तरी जाणे मस्ट... मग ते पाचनई मार्गे असो वा नळीच्या वाटेने. जुन २०१४ मध्ये ...

वारी हरिशचंद्रगड - नळीची वाट


अवघ्या भटक्यांची पंढरी असलेल्या हरिशचंद्रगडला वर्षातुन एकदा तरी जाणे मस्ट... मग ते पाचनई मार्गे असो वा नळीच्या वाटेने.

जुन २०१४ मध्ये झेनिथ ओडिसीज ची सुरुवात केल्या पासुन मी एक गोष्ट पाळते ते म्हणजे जर एखादा ट्रेक ना नफा ना तोटा असा करायची वेळ आली तरी तो करायचाच. क्वचित काही ट्रेक ला खिशाला चाट पण पडते पण सह्याद्री मध्ये फिरण्यासाठी सब कुछ करेंगे.

तर असा हा हरिश्चंद्रगडचा बेत ठरला. मी माझ्यापरीने जाहिरात केली पण नेहमीचे ३ आणि नवीन २ असे ५ जण ट्रेक तयार झाले. गाडीकाकानी नेहमी प्रमाणे पैश्याची खळखळ करत येतो म्हणून सांगितले. १० ला झेनिथ च्या ऑफिस मधुन उर्फ माझ्या घरून निघू याला नेहमी प्रमाणे टांग मारून ते त्यांच्या सोयींनी १०३० ला आले. मग सामान टाकुन संकल्पिता आणि मी टोब्याला घेऊन निघालो. गिरिशसर नळस्टॉपला वाट पाहतच होते. मग नाशिक फाट्यावर फिलिप, हर्षल आणि शुभम आले आणि आम्ही एकदाचे निघालो.

एके काळी राष्ट्रीय महामार्ग आहे अशी अफवा असलेला NH50 आज NH60 म्हणुन दिमाखदार झालाय. एके काळी म्हणजे फार पूर्वी नव्हे अगदी ३ वर्षापुर्वी इथून जाणे म्हणजे शिक्षा वाटत असे. तेव्हा हा रस्ता अतिशय अरुंद आणि खड्ड्यानी भरलेला होता मग याचा कायापालट झाला. आता चौपदरी आणि मुलायम अश्या या रस्त्यावरून प्रवास अतिशय सुखकर झालाय.

साधारण सव्वा वाजता आळेफाट्याला पोचलो. एक चहाचा राऊंड झाला आणि आम्ही खुबी फाट्याकडे वळलो. तिथून पुढे मी वल्हीवले - बेलपाडा साठी GPS लावला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे माळशेज घाटात वाहतूक फारशी नव्हती. साधारण ३ ला आम्ही बेलपाड्यात पोचलो. पुरुष मंडळींनी झाडाच्या पारावर पथाऱ्या पसरल्या तर मी आणि संकल्पिता गाडीच्या सीटांवर पसरलो.

सकाळी ५३० चा गजर लावला होता खरा पण दिवसभर झालेली धावपळ आणि रात्रभर रस्ता दाखवण्यामुळे झालेले जागरण या मुळे तो बंद करून झोपण्याचा मोह आवरला नाही. ६ ला आम्ही दोघी उठलो. नाश्त्यासाठी उपमा आणि चहा घेऊन बाकी आवरून निघे पर्यंत ८ वाजलेच. तरी नळीच्या वाटेने चढणार म्हणजे पश्चिमेकडून चढाई अर्थात उन्हाचा फारसा त्रास होणार नाही याची खात्री आणि म्हणुनच एक प्रकारचा मानसिक आधार वाटत होता.

ट्रेकला निघण्या आधीपासूनच मी गावात संपर्क करायचा प्रयत्न करत होते पण प्रस्थापित वाटाडे दाद लागू देत नव्हते. असो. सकाळी नाश्ता बनवत असताना, गावातील एक दोघेजण आले, मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण बहुदा पिकनिक type पब्लिक मुळे सवय लागली असेल वा काहीही कारणांनी त्यांनी अवाढव्य रक्कम सांगितली, जी मला परवडणार नव्हती. मग आम्ही तसेच चालु पडलो. मग त्यांनी तिकडे "वाहाघ" आहे, तुमच्यासोबत कुत्रा आहे वगैरे भिती घालायचा प्रयत्न केला. मी पण आगाव... त्यांना म्हणाले बिबटे माळशेज घाटाच्या आसपास नसतील तर काय पुण्यात सदाशिवात असतील काय? एवढे उत्तर पुरेसे होते आणि त्यांनी काढता पाय घेतला.

गावाबाहेर गणेश म्हणुन एक मुलगा येऊन मिळाला. त्याला विचारले येतोस का तर येतो म्हणाला. सोबत चालु लागला. आम्ही त्याची चौकशी केली तर नववी मध्ये आहे म्हणाला. मग आजची शाळा? असे विचारल्यावर बुडवली असे म्हणाला. गावापासुन पुढे येऊन २० मिनिटे झाली तसे म्हणायला लागला उशीर होतोय मी जातो. माझी बिदागी आणि बहिणीसाठी खाऊ द्या... मी थक्क झाले... नळीचे तोंड सुद्धा आले नव्हते. काय बोलणार आता. त्याला १०० रुपये आणि बहिणीसाठी खाऊचा पुडा दिला. फोटो वगैरे चमत्कार करून त्याला निरोप दिला.

गावाबाहेर आल्यावर टोबी ला मोकळा सोडला, तसेही त्याला धरून चालणे मला अवघड जात होते. कार्टा उधळला होता. त्याच्या उजव्या पायाची जखम पुर्ण बरी नव्हती झाली त्यामुळे मला जरा काळजीचं वाटत होती. पण मोकळे मिळाल्यावर तो खुष झाला होता.

मग आम्ही पुढे निघालो. काही ठिकाणी दगड (केर्न्स - cairns) रचले होते. आता टोबीनी पण मस्ती आवरती घेतली होती आणि फक्त पुढे मागे करणे चालु ठेवले होते. He was just acting like a good shepherd dog, trying to herd entire team together.

आता आम्ही मुख्य नळीत होतो, कोकणकडा समोर उभा ठाकला होता. त्याचे रौद्र रुप खुपच मनोहर होते. त्याला पाहताना काही दिवस आधी झालेला प्रसंग आठवून अंगावर शहारे आले. असो. आम्ही एक छोटा पाणी ब्रेक घेतला आणि पुढे निघालो. आता मुख्य नाळ आणि त्याच्या उजव्या डाव्या बाजुने २ उपनळी... आणि आम्ही confused! मी हा ट्रेक २ वर्षापुर्वी केला होता, मला बऱ्यापैकी आठवत होते पण नळीची वाट म्हणजे पावसाळ्यात धबधब्याची वाट अर्थात दर वर्षी बदलणारी... इथेही केर्न्स होते त्यावरून अंदाज बांधून आम्ही डावीकडची नाळ घेतली. साधारण २० मिनिटे वर
गेल्यावर कळाले कि पुढची वाट बंद आहे. आली का पंचाईत... बाकीच्यांना तसेच बसवून मी आणि शुभम परत
केर्न्स पर्यंत खाली आलो. मुख्य नाळी मधुनच चढायचे असे ठरवले. शुभम ला त्या नळीतून वर पाठवले आणि मी बाकीच्यांना आणायला परत गेले. दोन्ही नळी मध्ये एक safe पण गचपणानी भरलेला ट्रॅव्हर्स सापडला तो घेऊन आम्ही सगळे शुभम ला येऊन भेटलो. एक छोटा ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो.

हवामान अगदी छान होते ११ वाजले तरी उन्हाचा तडाखा नव्हता कि हवा आणि खडक गरम झाले नव्हते. आम्ही केर्न्स शोधत होतो. पण एकही दिसेना. तसेच परत वर गेलो. आता कोकणकडा अगदीच जवळ होता. आम्ही अगदी कोकणकड्याच्या पोटात पोचलो होतो... आता परत वाट चुकली होती. तेवढ्यात माझा फोन vibrate झाला. अर्रे range आली तर... मग मी एवढा वेळ आत ठेवलेला फोन काढला. व्हाट्सऍप आणि फेसबुक ला रॉयल इग्नोर मारत मी आधी गुगल मॅप्स चालु केले. (फोन नवीन आहे, बॅटरी टिकते वगैरे वगैरे, आणि एक सोलर चार्जेर आणि एक पॉवर बँक पाठीवर वागवली होती).


मग हा निळा ठिपका आहे ना तो आपण आहोत, हि पांढरी रेष आहेना ती नळीची वाट आहे. आपल्याला तिकडे जायचे आहे. तर एकूण आम्ही नालीच्या वाटेपासुन साधारणपणे १०० मीटर दक्षिणेकडे होतो. मग फिलिप आणि हर्षल थोडे पुढे जाऊन वाट शोधुन आले पण ती काही मिळाली नाही. मग आम्ही परत थोडे उतरलो. आधी वर चढताना फिलिपनी एक वाट पाहिली होती, जी मी नापास केली होती तीच घेतली आणि मग आम्ही पोचलो परफेक्टली नळीच्या वाटेवर.

आता सुरु झाला खरा थरार... मोठ्ठाल्ले दगड ज्यांना boulders म्हणता येईल असे पार करत, कुठे निसरडी माती कुठे छोटे रॉक patches. टोबीशेट मी कसा natural climber आहे ते दाखवुन देत होते. सकाळच्या उत्साहाची जागा आता सेफ्टी फर्स्ट नी घेतली होती. २ मुले आमची मदत करायला थांबली होती. तेवढ्यात एक गावकरी उतरताना दिसला. त्याला गिरीश सरानी विचारले किती वेळ लागेल. त्यांनी सांगितले जाताल वर ५ - ६ वाजेपर्यंत. तेव्हा माझ्या घड्याळात झाले होते २. अर्रे ३ तास फक्त... सगळ्यांच्या जीवात जरा जीव आला. मग सगळ्यांनी जरा झपाझप चालायला सुरुवात केली पण कसचं काय. नुसती दगडे आणि निसरडी माती. नाही म्हटले तरी वेग मंदावला होता. मग आला पहिला रॉक पॅच. टोबी काही बाजुनी सुट्या झालेल्या दगडांवरून जायला तयार नव्हता मग रोप लावुन त्याला वर चढवला, सोबतच सगळ्यांच्या सॅक दिल्या. आम्ही एक दोघे बाजुनी सुट्या झालेल्या दगडांवरून गेलो काही रोपची मदत घेऊन चढले. पहिला अवघड टप्पा पार पडला वेळ होती ३१५.
इथे एके ठिकाणी डोंगराच्या अगदी पोटातुन उजवीकडून जायचे होते. टोबी इथं अडकला... मी थोडी रागावले पण माझ्या लक्षात आले कि त्याचा डावा डोळा निकामी आहे, उजवा डोळा त्याला डोंगराला लावून पुढे येताच येणार नव्हते. मग मी पुढे झाले. सॅक उतरवली आणि फिलिप दिसत होता त्याला परत बोलावले. तो आल्यावर आम्ही टोबीला leash up केले आधी मी पुढे झाले फिलिपनी त्याला उचलून माझ्याकडे दिले, आणि टोबी पार झाल्यावर तो आला.

तसेच पुढे गेलो आणि १५ मिनिटात दुसऱ्या रॉक पॅच ला पोचलो, हा आधीच्या रॉक पॅचच्या तुलनेत उंच होता. साधारण ८ मीटर खडा आणि नंतर २ मीटर सोपा. शुभम आधी वर गेला. मग मी रोप घेऊन चढले, तिकडे नशीबाने एक झाड होते त्याला clove hitch मारून anchor केला. तेवढ्यात गडावरून माणिकराव आले, ते मला म्हणाले मॅडम तुम्ही मागे राहा मी पुढचे बघतो. सगळ्यात आधी टोब्याला haul केला. शेट आधी खाली उतरायला बघत होते मग अरे आपल्याला पण क्लाइंबिंग येते हे आठवल्यावर रॉक वर जोर देऊन चढायला लागले. मला खुप अनपेक्षित असा सुखद धक्का देऊन तो अलगद वर आला.
मग २ सॅक haul केल्या. मग रोपच्या एका टोकाला bowline on bight मारली, दुसरे टोक तसच सपोर्ट म्हणुन सोडले. सगळ्यात आधी संकल्पिता आली. तिला पाहुन मला धक्का बसला. पोरगी सॅक पाठीवर घेऊनच चढली होती. धन्य!
मग फिलिप आला, तो हि सॅक पाठीवर घेऊन चढला. मग गिरिशसर आले, त्यांची सॅक आधीच आली होती पण ते पण अतिशय सराईतासारखे पटापट चढून आले. बाकी सगळ्यांना पुढे पाठवून दिले आणि खाली हर्षल शिट्टी वाजवत होता. गिरिशसर त्याला विचारत होते, खुष दिसतोयस, तिथेच राहतोस का? बिचारा शेवटी एकटा राहिला होता खाली, आम्ही त्याला विसरून जाऊ नये म्हणुन शिट्टी वाजवत होता बहुतेक. रोप टाकल्यावर तो हि पटापट आला.

आता होता आला शेवटचा रॉक पॅच. तसा बराच सोपा होता. पण तरीही रोप लावुन चढलो. वेळ होती ५१५. म्हणजे काळोख होण्याआधी नळीमधून बाहेर आलो होतो. माणिकरावांनी सुमधुर असे लिंबु सरबत दिले आणि आमच्यासोबत भास्कर कडे निघाले. अपुरी झोप, आदल्या दिवशीची दगदग आणि आजचा ट्रेक यांनी खूप दमले होते आणि थोडी चिडचिड होत होती पण माणिकरावानी आम्हाला व्यवस्थित भास्करकडे पोचवले आणि सुपुर्त केले.
टीम ला टेन्ट्स लावायच्या आधी जेवायला सांगितले आणि मी टोबीची खाण्याची व्यवस्था करायला गेले.
टोबी जाम दमला होता पण काळा आणि डोळा दिसल्यावर त्याला त्यांच्याशी खेळायचे होते. मग मी त्याला पलीकडे भाकऱ्यांच्या चुलीजवळ बांधले आणि दुध पोळी दिली. ती खाऊन झाल्यावर त्याला झोपायचे होते पण माझे जेवण बाकी होते.

मी जेवायला बसले, तेव्हा आठवले मी दुपारी काहीच खाल्ले नव्हते. संत्र्याच्या २/३ फोडी, अमुल ताकाचा एक carton आणि २ ग्लास लिंबु सरबत यावर मी ट्रेक पुर्ण केला होता. तेवढ्यात भास्कर आला, माझ्या ताटाकडे बघुन हसायला लागला, असे कसे खातेयस... मग भाकरीचा कुस्करा, त्यावर कढी आणि ठेचा... अहाहा काय चव होती... बसच...

मग टेन्ट्स लावले... पण अफाट बेभान वारा... सॅक टाकल्या आणि सगळे झोपायच्या मुड मध्ये आले. पण हर्षल ला कढी प्यायची होती आणि गिरीश सरांना चहा. कढी मिळाली पण गर्दी बघुन मी भीतभीतच भास्कर ला विचारले चहा मिळेल का?अगं बाई तुला काय हवेय तू फक्त सांग... पुरवायची जबाबदारी माझी...

मग आई जवळ थोडं बसावे म्हणुन गेले तर तीनी आधी कान धरला, इतका वेळ कसा लागला म्हणून. मग सगळे सांगितल्यावर म्हणाली नशीब पोचलीस व्यवस्थित ते. रात्री ९ वाजले तरी लोक येत होते. भाकरी करण्याऱ्या मुलीला विचारले तर म्हणाली सकाळपासुन २०० भाकऱ्या मी एकटीनेच केल्या असतील. आई आणि दुसऱ्या मुलीच्या वेगळ्या...

सगळे आटोपून आम्ही रात्री ९३० ला एकदाचे अंथरुणात पडलो. रात्रभर वाऱ्यांनी टेन्ट फडफडत होता. शांत अशी झोप झाली नाही.

सकाळी चिवचिवाटापेक्षा गलक्यानी जाग आली. मला वाटले असेल एखादा ग्रुप पण टेन्ट बाहेर आल्यावर
माझी नजर जिथे जाईल तिथे टेन्ट लावलेले दिसत होते आणि कोकणकडा एखाद्या रेल्वे स्टेशन इतका गजबजला होता. अर्थात तक्रार करून उपयोग नाही. असो.

मी उठायच्या आधीच भास्कर पाचनईला गेला होता, चहा मग नाश्ता करून, हिशोब करून आई बाबांचा निरोप घेतला आणि आम्ही हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिराकडे आलो. मी टोब्याला घेऊन थांबले आणि सगळे गुहा बघून आले. मंदिरात मी पाणी भरायला गेले तेव्हा मंदिरामागच्या गुहेत दोन साधु पोथी मोठ्यांदा वाचत होते. सकाळच्या त्या वातावरणांत ते उच्चार मंगल वाटत होते. तिथेच ते ऐकत बसायची इच्छा होती पण वेळे अभावी शक्य नव्हते. बाहेर परत आल्यावर कोणी blue tooth वर तम्मा तम्मा ऐकत होते तर कोणी रामरक्षा लावली होती. मा पामराला या गोष्टी नाही कळत त्यामुळे त्या यात्रेकरूंची मी मनोमन माफी मागितली आणि आणि आम्ही बरोबर १० ला खिरेश्वर च्या रस्त्याला लागलो.

हा रस्ता तसा जरा सोपाच आहे फक्त थोडा वेळ जास्त लागतो. वाटेत ३/४ ठिकाणी ब्रेक घेत, लिंबू सरबत घेऊन तरतरीत होत आम्ही टोलार खिंडीतून खिरेश्वर गाठले आणि पुण्याच्या रस्त्याला लागलो.

या पुर्ण ट्रेक मध्ये फिलिप ची टोबीसाठी खुपच मदत झाली. पण एकंदरीत पहाता टोबीला रॉक क्लाइंबिंग च्या ट्रैनिंग ची नितांत गरज आहे तसेच त्याच्या दिव्यांगांमुळे त्याच्या हालचालींना काही बंधने येणार आहेत त्यानुसार प्लांनिंग करून त्याला नेणे योग्य होईल. अन्यथा अपघाताला आमंत्रण दिल्यासारखेच आहे.

वाटेत जेवण आणि चहा करुन पुण्यात मी घरी पोचले तेव्हा रात्रीचे ८ चे टोले पडत होते.



इति हरिश्चंद्रगड यात्रा अविघ्नम संपुर्णम!