तर गंमत अशी झाली होती की आम्ही मोमो वगैरे खाताना काढलेले फोटो बघून मॅडमना देखील त्यांचे फोटो काढून हवे होते. मग रेशमाला बोलावून ...

पुणे ते दिल्ली ते मनाली ते लेह - भाग २


तर गंमत अशी झाली होती की आम्ही मोमो वगैरे खाताना काढलेले फोटो बघून मॅडमना देखील त्यांचे फोटो काढून हवे होते. मग रेशमाला बोलावून स्वतःचे आवरून घेतले आणि मी गेले तेव्हा तिथे हॉटेलच्या गच्चीवर फोटो सेशन चालू होते.

मी फार वेळ थांबलेच नाही. खाली येऊन हॉटेल काकांशी गप्पा मारल्या. थोडी थातूरमातूर खरेदी केली. तोवर ७ वाजले होते किचन चालू झाले  म्हणुन ग्रुपवर मेसेज करून सगळ्यांना खाली जेवणाच्या खोलीत यायला सांगितलेजेवण वगैरे लवकर आटोपून लवकर झोपावे, २ दिवसांचा शिणवटा घालवावा अशी इच्छा होती. 

मला वाटले होते   थोडा आराम झालाय , मनासारखे फोटो सेशन झालेय म्हणजे  मॅडम ना बरे वाटले असेल तर त्यांचा रंग उडालेला होता, त्यांना बघून मला आत्ता की थोड्या वेळाने (डॉक्टर ची गरज) हा एकच विचार मनात आला. आम्ही जेवायला ऑर्डर दिली. चाउमेन नूडल्स, व्हेज फ्राईड राइस वगैरे. पण चव आवडली नाही तरी वाया जाऊ नये असा विचार करून कमी ऑर्डर दिली होती, लागलेच तर परत ऑर्डर देता येईल नाही आवडले तर हे संपवून दुसरे मागवता येईल, अन्न आणि पैसे दोन्ही वाया जाऊ नये  इतकाच विचार या मागे होता. 

सुर्यास्त झाल्यावर हवेतला गारठा वाढला होता, त्यामुळे ताटे, चमचे पाण्याची भांडी सगळे थंड पडले होते. मॅडमना पाणी हवे होते ते देखील दुसर्‍या कोणीतरी भांड्यात काढून द्यावे अशी अपेक्षा होती. मी शक्य तेवढे डोके शांत ठेवायचा प्रयत्न करत होते. खाणे आले तसे मॅडमनी अर्ध्या पेक्षा जास्त नूडल्स स्वतःच्या ताटात वाढून घेतल्या. भात चवीपुरता हवा म्हणुन तो ही वाढून घेतला. (आठवा सत्ते पे सत्ता)

उरलेसुरलं आम्ही गरिबांनी वाटून घेतले.  त्यांनी नूडल्स चे दोन घास खाल्ले, भात चिवडला, ताट सरकवले आणि मान टेबलवर ठेवली. मी सोयीस्कर दुर्लक्ष करायचे ठरवले. आणि रेशमाला शांतपणे खायला सांगितले. मैत्रीच्या गोंडस नावाखाली तिची होणारी फरफट पाहवत नव्हती.

खरेतर उष्टे अन्न वगैरे शिष्टाचार बाजुला ठेऊन या मुलीच्या ताटात वाढलेले आम्ही घेऊ शकलो असतो पण ते तसे सांगितले जायला हवे होते. तसे झालेच नाही. 

जेवण झाल्यावर रेश्माला म्हटले आता विचार मॅडमना काय होतय ते. तो पर्यंत हॉटेल काकांनी मला खाणाखुणा करून काय होतय, डॉक्टर कडे ने वगैरे सांगून झाले होतेच.

 रेश्माचा दयाळू आवाज ऐकून मॅडम म्हणाल्या ते अन्न वाया जातेय याचे मला खूऽऽऽप वाईट वाटते आहे आणि ओक्साबोक्शी रडू लागल्या.  रेश्माला म्हणाले ताबडतोब उठ आणि तिला घेऊन दवाखाना गाठराकेश ने टांग मारल्यामुळे आमच्याकडे गाडी नव्हती कोणी बाइक वाला वगैरे मदत करू शकेल का ते पाहिले का पाहिले पण त्याचा काही उपयोग नव्हताकाकांनी दवाखाना जवळच आहे तर चालतच जा असे सुचवलेत्यामुळे रेश्मा आणि मॅडम चालतच दवाखान्यात पोचल्या.

फोटो साभार आंतरजाल 
केलॉंग चा दवाखाना हे एक अजब प्रकरण आहे. रस्त्यावरून दिसणारी मोठ्ठी प्लस ची खुण हि दुरून डोंगर साजरे हि म्हण साजरी करणारी ठरली . जुन्या रामसे चित्रपटात असायचे तशी काहीशी इमारत आहे, तळमजल्यावर राडारोडा, मोडलेले फर्निचर वगैरे. त्यातूनच पुढे एक जिना. पहिल्या मजल्यावर बर्‍यापैकी अ-अद्ययावत  वैद्यकीय सुविधा. तिथून रेश्माने फोन करून कळवले की मॅडमचा ऑक्सिजन ५५ - ६० पर्यंत खाली आलाय आणि डॉक्टर ने त्यांना आता ऑक्सिजन लावला आहे

रात्री हॉटेलचे स्वयंपाक घर ११ ला बंद होते, मेरे बच्चे १२ के बाद हि सो पाते हैं, जल्दी सुबह नाश्ता नही दे पाऊंगा असे हॉटेल काकांनी स्पष्ट सांगितले. मग त्यानुसार हॉटेलचा राहायचा आणि खाण्यापिण्याचा हिशोब करून टाकला,  तेवढाच सकाळचा एक कार्यक्रम कमी. उद्याच्या प्रवासात सोबत असावे म्हणुन आम्ही केळी, ब्रेड बटर जॅम वगैरे घेऊन ठेवले तसे तर जागोजागी खायला मिळेल याची खात्री होती पण सोबत थोडे असावं! 

८४५ ला रेश्माचा फोन आला की मॅडम ना बरे वाटतेय, पण आधीच्या अनुभवाने मी तिला म्हणाले की तिला रात्री तिथेच under medical observation राहू दे. तसेही रात्री जर emergency ची वेळ आली तर परत हॉस्पिटल गाठणे जिकरीचे होईल

केलोंग हे थोडे मोठे खेडे आहे म्हटले तर वावगे नाही. पुर्ण गावात रस्त्यावर दिवे फक्त महामार्गावर आहेत. रात्री  ८ नंतर पुर्ण सामसुम, रस्ता विचारायला  चिटपाखरू देखील नव्हते. संध्याकाळी गुंजन ज्या दुकानात खरेदी करत होती तिथे उजेड दिसला, त्या ताईने वाट कुठून जाते ते सांगितले. आम्ही काळोखात ट्रेक केल्यासारखे चाचपडत उतरत होतो. एके ठिकाणी एक नवरा बायको दिसले, त्यांना विचारले तर तो म्हणाला मी येतो दाखवायला, आणि खरंच आला तो दवाखान्याच्या अगदी जवळ पर्यंत. जवळपास २ कि.मी चालत गुंजन, पल्लवी आणि मी हॉस्पिटल ला पोचलो. डॉक्टरशी चर्चा करून तिला राहू द्यायची विनंती केली. तिच्या ऍडमिशन कार्ड वर पालक म्हणुन मी सही केली.

तोपर्यंत मॅडमच्या अंगात जोर आला होता, त्या हॉटेल पर्यंत चालत येते म्हणत होत्या. Resident डॉक्टरने चर्चेत मला स्पष्ट सांगितले होते अभी और exertion नही करे तो बेहतर है और आगे का रास्ता difficult है, इनको आप नीचे मनाली भेज दिजीए.

आता तिला परत मनालीला कसे पाठवायचे हा नवा विषय आमच्या परीक्षेत अचानक उद्भवला. पण देवाने याचे उत्तर समोरच ठेवले होते. त्याच वेळी तिथे दाखल असलेले एक कपल त्यांची ट्रीप अर्धवट सोडून परत जाणार होते ते सकाळी तिला घेऊन जाऊ शकतो असे म्हणाले.

रेश्माचा निरोप घेऊन आमची वरात हॉटेल कडे निघाली. केलॉंग जरी राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असले तरी उंच सखल भागात आहे त्यामुळे परत महामार्गावर येऊन आम्ही हॉटेल मध्ये पोचेपर्यंत रात्रीचे १०३० झाले होते.

हाय अल्टीट्युड ला आमचा देखील पहिलाच दिवस होता, या सगळ्या प्रकारामुळे आम्ही तिघी आणि रेश्मा अनावश्यक थकत होतो! थकलो होतो! रेश्मा ला हॉस्पिटल मध्ये एक बेड त्यांनी उपलब्ध तर करून दिला होता पण तो कितपत comfortable होता कुणास ठाऊक. आम्ही झोपायचा प्रयत्न केला. मला शांत अशी झोप लागली नाही, रात्रीत रेशमाचा फोन आला नाही म्हणजे सगळे आलबेल असावे.

आपण जनरली बोलताना म्हणतो तीन तिगडा  काम बिगडा ... इथे तशीच परिस्थिती झालीये असे वाटत होते. कोणी तरी एकीने हॉटेल वर थांबायचे तर ती एकटी , तिच्यासोबत कोणाला थांबवावे तर हॉस्पिटल ला जाणारी एकटी! त्यामुळे तिघींची वरात हॉटेल वरून हॉस्पिटलला आणि रिटर्न!

१३ जुन २०२२

सकाळी ५४५ ला राकेश चा पहिला फोन आला, त्याला म्हणाले बाबा रे थोडा उशिराने ये. त्याचे म्हणणे होते की जलदी निकलेंगे  तो जलदी पहुंचेंगे... मी म्हणाले निकल पाये तो पहुंचेंगे! त्याला काही सांगायच्या परिस्थितीमध्ये नव्हतेच. फोन बंद केला आणि परत थोडा वेळ झोपले. पण तो बिचारा डिझेल भरून हॉटेल खाली येऊन थांबला. अखेरीस  ६३० ला आम्ही उठलोच. गुंजनला हॉस्पिटलात पाठवून रेशमाला बोलावून घेतलेहॉटेलला परत आल्यावर रेश्मा ने आवरले, बॅग परत नीट पॅक केली, मॅडमची पण बॅग नीट पॅक केली. मी देखील आवरले आणि आम्ही बॅग्स घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. गुंजनला परत पाठवून आवरून घ्यायला सांगितले 

डॉक्टर ने मॅडमचा discharge ११ नंतर होईल असे सांगितले. ११ नंतर निघून आम्ही लेह ला संध्याकाळ पर्यंत पोचू शकणार नव्हतो, व्यावसायिक दृष्ट्या मला ते परवडणारे नव्हते. तसेच भाग एक मध्ये म्हटल्या प्रमाणे आम्ही चौघीच असु, कोणाची काय स्ट्रेंग्थ आणि विकनेस आहेत याचा विचार करून प्रवासाचा प्लॅन ठरवला होता, त्यात एका व्यक्तीसाठी इतरांचे नुकसान करणे शक्य नव्हते आणि योग्य देखील नव्हते. जर या व्यक्तीची वागणुक योग्य असती तर कदाचित गोष्टी वेगळ्या हि झाल्या असत्या. माहित नाही! 

कोणाला वाटत असेल मी नैतिक दृष्ट्या चुकले तर ते वाटू दे. पण रेश्माला, मला आणि नंतर गुंजन आणि पल्लवीला जी अपमानास्पद वागणुक पावलोपावली दिली गेली याचे कार्मिक फळ त्या व्यक्तीला मिळाले असू शकेल.  I have trained myself to let go of grudges but not lessons. There is no bitterness but then one should not expect me to be sweet either. सूड भावनेने मी काही करायला जात नाही, ज्याचे मन त्याला खात असते अशीच व्यक्ती माझ्या वागण्याचा सोयीनुसार अर्थ लावत आपली energy वाया घालवत असते. 

हॉस्पिटलमध्ये मॅडमनी परत attitude दाखवलाच.  रेश्मा चार गोष्टी सांगतेय तर त्याकडे पुर्ण दुर्लक्ष करून स्वतःचे घोडे दामटवत राहिल्या. माझे डोके तापायला लागले तसे मी बॅग तशीच सोडून खाली निघून आले. पाच मिनिटांनी रेश्मा आली आणि तेव्हाच राकेश परत आम्हाला घ्यायला आला. शेवटी एकदाचे आम्ही तिथून निघालो. पुढे हॉटेलमधून पल्लवी आणि गुंजनला गाडीत घेतले आणि आम्ही लेह च्या दिशेने प्रस्थान केलेवेळ सकाळी ८३०. 

जिस्पा येईपर्यंत पहिला नंबर रेश्माने लावला आणि खाल्लेले केळ तिला उलटून पडले. मग काही वेळाने आलटून पालटून तिघी गाडी थांबवत राहिल्या. झिंगझिंग बार, बारालाचा ला, दारचा, सारचू, गाटा लूप्स , नकी ला, लाचुंग ला, कधी फोटो विश्रांती तर कधी चायपानी असे थांबत थांबत आम्ही चाललो होतो

दारचा जवळ पुल ओलांडल्यावर आम्ही एके ठिकाणी चहा नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा गुंजन ला उपका आला आणि ती एका बाजुला गेली. मी पाण्याची बाटली घेऊन तिच्या जवळ गेले तर ती मला म्हणाली दूर जा, तुला नको त्रास होयला तेव्हा  मी बाटली देऊन परत आले. तेव्हा रेश्मा म्हणाली तिला त्रास होताना पण तुला त्रास होऊ नये याची काळजी होती ,तेच मी बस मध्ये रात्रभर पिशव्या देणे वारा घालणे टिश्यू देणे एवढेच काम ऑन ऑर्डर  करत होते. 

बहुतेक बारालाचा ला नंतर कोणालाही कसलाच त्रास झाला नाही . पांग येथे ना थांबता पुढे घाट चढून मुरे प्लेन्स इथे थांबावे असे राकेशचे म्हणणे होते. आता सूर्य मावळतीकडे झुकायला लागला होता, त्याला लेह ला पोचायची घाई झालीये असे वाटत होते. पण चर्चा करायची ती वेळ नव्हती. पहाटे पासून जागा असल्यामुळें तो दमला देखील असावा. हाय अल्टीट्युड ला  शक्यतोवर मी कोणालाही जास्त प्रश्न विचारणे टाळते, त्या व्यक्तीला तिची / त्याची स्पेस द्यायची, पण अखंड सावधान राहायचे! हे आज देखील पाळायचे हे मी स्वतःला बजावत होते. 

ऑफ रोड ला फसलेली गाडी, मागचे चाक पहा! 

पण तिथे एके ठिकाणी शॉर्ट कट म्हणून भाऊने गाडी ऑफ रोड ला घातली आणि फसली! त्याची थोडी चिडचिड होतेय असे वाटत होते मला पण नाईलाज होता. तिथे जवळपास एक तास वाया गेला. मी त्याला गाडी कशी काढता येईल हे सांगत होते पण अनोळखी ते हि एक मुलगी काही सल्ला देऊ शकते या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. शेवटी गाडी मी सांगत होते त्या पद्धतीनेच निघाली. मग आम्ही थोडे अंतर उलटे परत  पांग ला गेलो आणि थोडी पोटपूजा केली. वेळ होती दुपारचे ४३०.

तिथून निघालो आणि चांगल्या रस्त्याने वर मूरे पठरावर आलो. ही  जगातली माझी सगळ्यात आवडती जागा! 

समुद्र सपाटी पासून ४८०० मीटर उंचीवर वर सरळसोट ३५ किमी अंतराचा मक्खन रस्ता, चहूकडे उंच उठलेला लडाखचा तपकिरी हिमालय, मधुन मधुन दिसणारी तिबेटी गाढवे, पश्मिना बकऱ्या आणि ब्लू शिप ऊर्फ भरल, आणि समोर दिसणारा टॅगलाँग ला चा डोंगर... स्वप्नवत... 

पण बेजबाबदार लोक पावलोपावली आढळतात आणि काशी करतात! 

वाटेत लडाख पोलीस हायवे पॅट्रोल च्या गस्त घालणाऱ्या एका गाडीने एका पर्यटकांच्या गाडीला थांबवले होते, त्यांच्यापैकी एक जण बॉनेट वर आणि एक जण सनरूफ मधून बाहेर अशी त्यांची वरात चालली होती. तिथून पुढे २ / ३ किमी वर एक "किया" बंद पडली होती, तो बाबाजी राकेशला गाडी का फिल्टर खराब हो गया है कहाँ मिलेगा वगैरे विचारत होता. मी डोक्याला हात लावला. त्यांना मागून येणाऱ्या पोलिसांची मदत घ्यायला सांगितली (मनाली साधारण २५० किमी लेह २०० किमी!)

डेब्रिंग इथे रेश्मा 

इथे डेब्रिंग म्हणुन एक वस्ती लागते तिथे आम्ही परत एकदा टॉयलेट आणि चहा साठी थांबलो. राकेश गाडीतच बसल्या बसल्या झोपला.  त्याचे हे वागणे पाहून मला थोडे टेंशन आले. त्यामुळे निघताना इथून पुढे गाडी मी चालवते असे ठामपणे  सांगितले. त्याप्रमाणे मी गाडी चालवायला घेतली. तो निमुटपणे बाजूला जाऊन बसला. वेळ संध्याकाळचे ६३०. ( या ट्रिपमध्ये इथे गाडी चालवेन असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.)



जिथून सुरुवात केली तिथून लेह शहर १६० किमी असा काहीतरी माईल स्टोन होता. आता सुर्यास्त होईल मग पुढे गाडी अंधारात चालवायची आहे ते देखील हिमालयात! नाना विचार येत होते मनात. निघाल्यावर अर्ध्या तासात टॅगलांग ला च्या डोंगरावर गाडी चढू लागली. ५३३० मीटर उंची असलेली ही खिंड देशातल्या पहिल्या पाच पासेस मध्ये आहे.

टॅगलांग ला इथे पल्लवी, मी आणि रेश्मा.    

संधिकाल होता, सुर्यास्त झाल्यामुळे हवेतला गारठा वाढायला सुरुवात झाली होती त्यात बर्फाचा पाऊस सुरू झाला. आम्ही टॅगलाँग ला ला पोचलो तेव्हा एकच गाडी तिथे थांबली होती. पण त्या लोकांचे मूड काही ठीक दिसत नव्हते, काहीतरी चिंता असावी. इतक्यात एकजण खांद्यावर एकाला घेऊन येताना दिसला.राकेश झोपला होता, गुंजन गाडीतच बसुन होती आणि रेश्मा आणि पल्लवी फोटो काढत होत्या. त्या इसमाला पाहिल्यावर मला परिस्थितीचा अंदाज आला. मदत करायची इच्छा झाली होती ती आवरली कारण या तिघींना माझ्यासकट लेह ला सुखरूप पोचवणे माझ्यासाठी जास्त गरजेचे होते. व्यावसायिक दृष्ट्या सकाळी पुढच्या ट्रिप चे मेंबर्स यायच्या आधी मी लेह मध्ये पोचणे आवश्यक होते. त्यामुळे मी त्या दोघींना ताबडतोब गाडीत बसायला सांगितले आणि आम्ही तडक निघालो.

 घड्याळावर तापमान उणे ३ सेल्शियस  दाखवत होते पण ते तेवढे होते कि कमी जास्त याची मला खात्री नाही. 

आता घाट उतरायचा होता, त्यात बर्फ आणि अंधार... बहुदा २०११ च्या गणेशोत्सवात मी गोव्याहून येताना मोलेम अभयारण्यात भर पावसात पुर्ण रात्र चिखलातून गाडी चालवत बेळगावला आणली होती त्यानंतर आत्ताच practically challenging अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

गुंजन आणि मी रामरक्षा म्हणत राहिलो. अतिशय हळू गाडी चालवत होते, पण पाहिले तर सगळेच त्याच वेगाने चालवत आहेत असे वाटले. शेवटी एकदाचा घाट संपला आणि आम्ही रूमस्तेला पोचलो. नोटिफिकेशन्स वाजू लागली तसे जिओ जम्मु काश्मिर ने आमचे लडाख मध्ये स्वागत केले आहे असे लक्षात आले ,  तिथून पहिला फोन ग्रीष्माला केलाग्रीष्मा सांगलीची आहे, आणि तिचे हॉस्टेल आहे लेह मध्ये संकर रोड लाआम्ही रात्री तिथे राहू असे ठरवून तिला आमच्यासाठी रूम्स ठेवायला सांगितल्या होत्या. पण कीलाँग च्या पुढे नेटवर्क नव्हते आणि सकाळच्या गोंधळात फोन करायचे राहून गेले होते त्यामुळे पुढचे काहीच बोलणे झाले नव्हते. तिच्याकडेच जेवायची व्यवस्था करायला सांगितले. रूमस्तेहून पुढे उपशी आणि सिंधु नदीला समांतर  रस्त्याने लेह असे सुमारे ५० किमी अंतर.

उपशी आले, चेक नाक्यावर राकेश ने कागद पत्रे आणि आमची  परमिट्स दाखवली. इथे सिंधू नदीचे पहिले दर्शन होते, इथून निघाल्यावर आपण एकदा सिंधू ओलांडतो आणि तिथपासून ती आपल्या डाव्या बाजूला  लेह शहरापर्यंत सोबत करते. 

लेहला पोचल्यावर मुंबई पुण्याहून निघणाऱ्या मंडळींची खबरबात घेतली, थोडा डाळ भात खाऊन रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही अंथरुणावर खोल्यांमध्ये पाठ टेकली. आणि झोपेच्या आधीन झालोआज एक स्वप्न थोडे का होईना पुर्ण झाले होते! रात्रभर डोळ्यांपुढे बर्फ पडत राहिला, आणि आमची गाडी लडाखच्या दिशेने जात होती! 

Rant 

लडाखच्या आधी पुरेशी नोटीस देऊन २ वेळा मीटिंग घेतली, त्या व्यक्तीने त्याला देखील यायचा उत्साह दाखवला नाही. एकदा मावशीचा वाढदिवस आहे हे कारण दिले. एक आठवडा आधी मीटिंग साठी कळवले होते तर मावशीचा अचानक जन्म झाल्यासारखा वाढदिवस आला. मीटिंग ची वेळ फक्त दीड तास होती, हि व्यक्ती जर स्वारगेट परिसरात रहात असेल तर मिटिंग बादशाहीला होती! बर आपण येणार नाहीयोत हे कळवण्याची तसदी सुद्धा घेतली नाही! 

दुसऱ्या मिटिंग च्या वेळी सगळ्यात सिनियर काकु ज्या डायरेक्ट लेह ला येणार होत्या त्यांना म्हणाली बरं झाले तुम्ही आहात, वेळ पडली तर श्रद्धाला  झापू शकाल. त्या काकुंना देखील याचे आश्चर्य वाटले होते. लडाखच्या पुर्ण टूर मध्ये सगळ्यांनी प्रचंड सहकार्य केले, त्यात या काकुंचे कौतुक करावे तेव्हढे कमीच पडेल. सहलीच्या आधी आणि दरम्यान मी दिलेल्या सुचना तंतोतंत  पाळल्या या काकुंनी, त्यांना त्रास होत असताना देखील इतरांना त्रास होऊ नये याची प्रचंड काळजी घेतली. असो.