कोविड नंतर लडाखची ट्रिप खास असणार याची खात्री होती. ट्रिप जाहीर करताच रेश्मा ने बुकिंग केले, गुंजन म्हणाली मी पण येतेय आणि पल्लव...

पुणे ते दिल्ली ते मनाली ते लेह - भाग १


कोविड नंतर लडाखची ट्रिप खास असणार याची खात्री होती. ट्रिप जाहीर करताच रेश्मा ने बुकिंग केले, गुंजन म्हणाली मी पण येतेय आणि पल्लवी सुद्धा खूप काळाने मोठा दौरा करायचा म्हणुन उत्साहात होती. 

खरेतर मनाली ते लेह या राष्ट्रीय महामार्ग ३ वर तसे तर २०१४ पासुन बऱ्याचदा जाणे झालेलं. मला अटल बोगदा बघायची अनुभवायची प्रचंड इच्छा होती. पण कोविड काळात ऑक्टोबर २०२० नंतर संधी मिळाली नव्हती आणि आता चालून आलेली संधी मला सोडायची नव्हती. या तिघी तयार आहेत म्हटल्यावर मी जरा जास्तच खुश झाले. 

 Zenith Odyssey ची ट्रिप लेह ते लेह असणार होती. पण या तिघीनी माझ्यासोबत मनाली ते लेह रोड ट्रिप करायची इच्छा दर्शवली. गुंजन योगगुरु आहे, आमच्या काही इतर ट्रिप्स झाल्यात त्यामुळे तिच्यासोबत प्रवास करणे हा आनंददायक अनुभव असेल याची खात्री होती. रेश्मा सोबत पहिलीच ट्रिप असली तरी ती ट्रेकर आहे, तिने बेसिक माउंटेनियरिंग कोर्स केला आहे त्यामुळे तिला देखील हाय अल्टीट्युड चा अनुभव आहे हि माहिती होती. तसेच वेळेनुसार अड्जस्ट करायची तिची तयारी असते त्यामुळे she will not be a burden याची खात्री होती. पल्लवीला तशी मी technically बरीच वर्षे ओळखते, अतिशय शांत आणि सुस्वभावी अशी हि मुलगी इन्ट्रोव्हर्ट आहे पण खुलली कि ग्रुप ची जान. तिच्यासोबत adventure साठी मीच उत्सुक होते. 

प्लॅन ठरला पुणे ते दिल्ली विमान प्रवास ११ जुन , दिल्ली ते मनाली रात्रभर प्रवास करून १२ जुन ला सकाळी लगेच मनाली ते किलॉंग असा टॅक्सीचा प्रवास , तिसऱ्या दिवशी किलॉंग ते लेह म्हणजे १३ जुन ला. आणि १४ जुन ला बाकी मेंबर्स लेह ला पोचतील मग लडाख ची भटकंती. तर मग आमचे ठरले त्या प्रमाणे रेश्मा ने तिचे, पल्लवीचे आणि माझे पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट बुक केले तारीख होती २४ एप्रिल २०२२. गुंजनने या सुमारासच तिचे मुंबई ते दिल्ली असे रेल्वे तिकीट काढले. मग दिल्ली मनाली अशी माझ्या आवडत्या HPTDC बसची तिकिटे काढून झाली. 

मग टॅक्सिची शोधाशोध सुरु केली. हो ना करता ३ - ४ जण तयार होते. त्यांनी सांगितलेल्या रक्कमेत एखाद दोन हजाराचा फरक होता त्यामुळे कोणाला हो सांगावे ते कळत नव्हते. मधल्या काळात केदारनाथ साठी जो ड्राइव्हर ठरवला होता त्याने बुकिंग साठी पैसे पाठवल्यावर रक्कम वाढवुन सांगितली होती, त्यामुळे माझा संभ्रम आणखी वाढला होता. 

याच गोंधळात वाढ आमच्या लडाखच्या बाकी मेंबर्स पैकी दोघींनी करायला सुरुवात केली. एकीने मला आता जमत नाहीये तर माझी बुकिंग अमाऊंट परत दे चा घोषा लावला तर दुसरीने मुंबई लेह असे बुक केलेले तिकीट नुकसान झेलून रद्द केले आणि आमच्या सोबतच लेह ला रस्त्याने येणार असे सांगितले. तिने त्या नुसार पुणे दिल्ली असे त्याच विमानाचे शेवटचे राहिलेले तिकीट आमच्यापेक्षा जवळपास दुप्पट किंमत देऊन आरक्षित केले. एखादी व्यक्ती इतकी हटवादी असू शकते हा माझा पहिलाच अनुभव नसला तरी थक्क करणारा निश्चित होता. पण हि तर फक्त सुरुवात होती. जिचे बुकिंग रद्द होत होते त्या जागी दुसरी मुलगी आली त्या दोघींच्याच रेफेरन्स ने, पण नियम तोडायचा हि नाही पण हि ब्याद तर जाऊदे म्हणुन तिला निम्मे पैसे दिले आणि पिच्छा सोडवला. 

मॅडमची एंट्री झाल्यावर त्या अजुन काय काय करू शकतात याची चुणूक त्यांनी आम्हाला दाखवायला सुरुवात केली. फेसबुकवरच्या एका कळपात दिल्ली, मनाली लेह असे प्रवासाचे ऑप्शन त्यांनी शोधले, त्याचे screenshot आम्हाला पाठवले. हिमाचल प्रदेशची एक ST बस दिल्ली ते मनाली ते लेह अशी जाते. ती आपल्या लाल परी सारखीच असते. तिकीट वाजवी दरात आणि परिस्थिती लाल परी इतकीच comfortable. या बसने प्रवास करायला माझी एरवी हरकत नसते पण पुढची ट्रीप ठरलेली होती. अंग तिंबलेले, दमछाक झालेली अश्या परिस्थितीत पुढची ट्रिप पार पाडणे अवघड झाले असते माझ्यासाठीच नव्हे तर तर इतर सर्वांसाठी देखील. मला पदोपदी पुलंची आठवण येत होती. त्यांनी प्रत्येक प्रसंगात योग्य ठरेल असे वाक्य लिहून ठेवले आहेच. 




काहीही सांगितले तरी: "मला कोणीतरी सांगितले आहे कि तो रस्ता एकदा तरी एक्सपेरियन्स करावा असा आहे तर मला देखील तुमच्या सोबत यायचे आहे" एवढे एकच वाक्य कॉन्स्टन्ट आर्ग्युमेण्ट म्हणुन पुढे येत होते.  वास्तविक पाहता, एक additional टीम मेंबर म्हणजे टॅक्सी च्या खर्चात मध्ये अजुन एक विभागणी म्हणजे आपला खर्च कमी हा स्वार्थी विचार करून आम्ही चल आमच्या सोबत असे म्हणू शकत होतो परंतु तो रस्ता इतक्या वेळा पाहिला आहे, तसेच हाय अल्टीट्युड ला काय त्रास होऊ शकतो हे माहित असल्यामुळे व माझा मुख्य उद्देश लेह ते लेह ट्रिप नीट करणे हा असल्यामुळे या मुलीने आमच्या सोबत हा प्रवास न करणे जास्त योग्य होते. या प्रवासात त्रास झाला तर मी कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही, जवळच्या मेडिकल सेंटर ला पोचवून सोडून जाईन हे देखील स्पष्ट केले. अर्थात त्रास होऊ शकतो हे सांगुन देखील इतका हटवादीपणा केल्यावर या पुढे आपण काहीही सांगायचे नाही हे मी मनाशी ठरवले. एखाद्या व्यक्तीशी मैत्री करणे आणि ती टिकवणे हि दोन्ही व्यक्तींची जबाबदारी असते. प्रसंगी वाद होतात पण त्यातला गाभा, उद्देश समजुन पुढे जायचे कि नाही हे ठरते. इथे बेसिक मैत्रीच होऊ शकत नाही हे मधल्या काळात झालेल्या फोन वर लक्षात आले. 

लडाखच्या आधी झेनिथ ओडिसी ची केदारनाथ यात्रा होती, तिथे खरेतर मलाच AMS ची लक्षणे जाणवली होती, पण अनुभव असल्यामुळे वेळेवर योग्य ती दक्षता घेऊन मी सुरक्षित परत आले. त्यामुळे लडाख ला जाताना फारसा त्रास होणार नाही याची मनात आशा होती आणि झाले पण तसेच. खरतर ग्रुप मध्ये वाढ झाली की बर्‍याच गोष्टी positively बदलतात, पण इथे येणारी नवीन व्यक्ति liability बनणार आहे हे दिसत होते. आता परतीचे दोर कापले गेल्या सारखे झाले होते. केदारबाबाला प्रार्थना करून मी लडाखची तयारी केली. 

दिल्ली विमानतळ 

होता होता ११ जुन २०२२ उजाडला आणि आम्ही पुणे विमानतळावर भेटलो. तिथे सुरक्षा तपासणी झाली आणि आमचे विस्टाराचे विमान दिल्ली कडे झेपावले. Vistara was a good experience. Ground staff and in flight attendants etc were really courteous and helpful. त्यादिवशीचे त्यांना १०० पैकी १०० मार्क. पुण्याच्या शेकोटीतून आम्ही दिल्लीच्या भट्टीत पोचलो होतो. एअरपोर्ट मेट्रो ने द्वारका ला पोचलो तिथे लाईन बदलुन ब्लू लाईनने मंडी हाऊस असा प्रवास करून आम्ही वेळेत हिमाचल भवन ला दाखल झालो. हिमाचल भवनचे कॅन्टीन देखील छान आहे. भरपुर कॉफी, खुप सारी सँडविच, ऑम्लेट आणि काही खाऊन आम्ही बस ची वाट पाहत होतो. गुंजन आली नव्हती त्यामुळे माझी घालमेल सुरु होती. त्यात मॅडम हटवादी इतके सामान घेऊन आलेल्या कि त्यांचे सामान त्यांना स्वतःला झेपत नव्हते. मैत्रीखातर रेश्माची कुतरओढ होत होती आणि आम्ही हतबल होऊन पहात होतो. 

बस लागली आणि आम्ही सामान एकत्र टाकायचे म्हणुन गुंजनची वाट पाहत होतो. मागच्या वेळच्या अनुभवाने मला खरेतर आमचे सामान सगळ्यात आत जावे असे वाटत होते पण गुंजन येईपर्यंत बाकी प्रवाश्यांचे सामान टाकून डिक्की बहुतेक भरत आली होती. पण तेवढ्यात वेळेत गुंजन आली आणि सामान आत गेले आणि आम्ही बसल्यावर बस सुटली. HPTDC च्या वोल्वो च्या बसेस अतिशय आरामदायक आहेत. दिल्लीतून निघाल्यावर चंदिगढच्या पुढे मागे या बसेस जेवणासाठी थांबतात. मला राजमा चावलची भुक बरेच दिवस लागली होतीच. इथे पोचेपर्यंतच मॅडम हटवादिंचे दोन वेळा ओकून झाले होते. मला पुढे काय होणार आहे याची जाणीव होऊ लागली होती. सगळ्यांसोबत मी आपले पोटभर खाऊन घेतले, मॅडमना डॉमस्टेल दिली, कंडक्टर कडून अजून - पिशव्या दिल्या आणि परत बस मध्ये बसण्यापुर्वी देवाला प्रार्थना केली कि निदान मनाली पर्यंत प्रवास नीट होऊ दे.


तिथून निघाल्यावर अर्ध्या तासातच मॅडमनी पुन्हा कार्यक्रम सुरु केला. बर असे हि नव्हते की त्या आणि रेश्मा खूप मागे किंवा चाकावर वगैरे बसल्यात, ड्राइवरच्या मागे पहिल्या सीट वर मी आणि पल्लवी आणि मागच्या सीट वर त्या दोघी आणि गुंजन एकटीच खूप मागे कुठेतरी. पुर्ण गाडीत केवळ २ व्यक्तींना त्रास होत होता, त्यात पहिला नंबर या मॅडमचा आणि दुसरा नंबर एक ७१ वर्षीय काकू होत्या त्यांचा होता. या काकूंना देखील कमी त्रास झाला. 

मला नियमित प्रवास करून आता कुठेही शांत झोप लागते, त्यानुसार पहाटे ३ साडेतीन ला स्वारघाट येई पर्यंत छान झोप लागली होती. तिथे खरंतर HPTDC ने एखादी टॉयलेटची सोय करावी. स्वारघाट येथे ड्राइव्हर बदलतात आणि नव्या जोमाचा गडी कामाला लागतो. इथे उतरलो तेव्हाच रेश्मा एक मिनिट देखील झोपली नाहीये हे लक्षात आले. पण तिची काय आणि कशी मदत करावी हेच मला कळले नाही. 

स्वारघाट ते पंडोह पुन्हा जवळपास ४ तास प्रवास करून थांबलो तेव्हा उजाडू लागले होते, आम्ही चहा घेतला. मॅडम आता पाणी देखील नको म्हणत होत्या. जागरण त्यात उलटीमुळे झालेलं dehydration आता त्यांना मनाली मधेच रुग्णालयात दाखल करावे लागते कि काय असे मनात येऊन गेले. सकाळी ९३० ला मनालीला पोचलो. राकेश राणा ची गाडी ठरवली होती, त्याचे फोन येऊन गेले होते पण माझा फोन मस्ती करत होता आणि आमचा कॉल कनेक्ट होत नव्हता. मग गुंजनला त्याचा नंबर देऊन बोलायला सांगितले. ११ पर्यंत निघून जिस्पा पर्यंत पोचू आणि आज तिथे राहू असा विचार होता. 

मनाली मध्ये नव्या नियमानुसार या बस आता मॉल रोड ला जात नाहीत. त्यानुसार गावाबाहेर उतरून दुसरी टॅक्सी घेऊन मॉल रोड ला पोचलो. थोडा वेळासाठी पाच जणींमध्येच अशी एकच खोली घेतली आणि आवरून घेतले. मॅडम ना आता काहीच करायचे नव्हते त्यांचे सामान पण रेश्मा आणि हॉटेल स्टाफ ने खोलीत पोचवले. इलेकट्रॉल आणि नाईलाज म्हणुन एक diamox अशी सरबराई करून आम्ही आपापले आवरले. मॅडम ना आवरायचे होते म्हणुन रेश्मानेच सगळी तयारी करून दिली अगदी टूथ ब्रश पासुन सगळी. मग राकेश चा निरोप आला कि तो टॅक्सी स्टॅन्ड वर आलाय. आम्ही निघालो सकाळी परत नाश्ता म्हणुन केवळ ब्रेड बटर खाल्ले होते. मग त्याला म्हणाले रस्त्यात थांबव खाऊ कुठेतरी, तो हो म्हणाला. 


I was already highly excited to see Atal Tunnel. तसे पाहता मला बंद जागांची भीती वाटते, claustrophobia. But it was time to challenge myself and prove it to myself that I can be better than what I was. आणि बाकी तो बोगदा बनवण्यामागे असलेली स्वर्गीय अटल जींची दृष्टी आणि मा पंतप्रधान मोदीजींची मेहनत हि कारणे मला प्रोत्साहन द्यायला होतीच. मनाली मागे पडले आणि रोहतांगच्या वाटेवर आहोत असे वाटेपर्यंतच राकेश ने गाडी कुठेतरी वळवली, आणि अचानक Atal Tunnel १४ किमी अशी मैलाची कमान दिसली. माझी excitement शिगेला पोचली. हळूहळू ट्रॅफिक धीमा झाला आणि आम्ही south पोर्टल च्या बाहेर पोचलो. राकेश म्हणाला फोटो वगैरे काढायचे असतील तर जाऊन या. नेकी और पूछ पूछ... गेलो आम्ही सगळ्या लगेचच. 


बोगद्यात थांबायची परवानगी नाही पण न थांबता फोटो व्हिडिओ काढू शकता. पुर्ण ९ किलोमीटर बोगदा आहे, थोडा जास्तच. architectural marvel!!! 

(विषयांतर: क्लिफ्टन सस्पेन्शन ब्रिज २००७, जम्मू श्रीनगर महामार्गावरचा जवाहर टनेल २००९, करबुडे बोगदा २००६ रामेश्वरम मदुराई मधला पम्बन सेतू २००२, २०११, कोलकाता मधील हावडा सेतू आणि विद्यासागर सेतू २०१२, २०१४, २०१६, मुंबईचा सी लिंक २०११ आणि आता अटल टनेल २०२२... checked! (आता प्रतीक्षा चेनाब सेतूची) (सुदूर पुर्वेकडे ब्रह्मपुत्र नदावर देखील एक नवा सेतु बांधला आहे, तो हि आहे लिस्ट मध्ये. असो! )

दुपारी १२४५ च्या आसपास 

रोहतांगमार्गे जाताना मनालीहून निघाल्यावर जवळपास ५ तासांनी सिस्सू या गावी पोचायचो ते २ तासात पोचलो होतो. मुली म्हणाल्या आत्ता लगेच नको थांबायला थोडे पुढे जाऊ. मग इंडियन ऑइल चा फेमस पेट्रोल पंप लागला तिथे एक चाय पानी  ब्रेक घेऊन परत पुढे निघालो केलॉंग ला पोचलो तेव्हा दुपारचे २३० वाजले होते. इथे मला उजव्या बाजूला थोडे खाली एक मोठे हॉस्पिटल दिसले. आम्ही जेवायला थांबलो तेव्हा मॅडम हटवादींची परिस्थिती बघून मी केलॉंग लाच राहायचा निर्णय घेतला. राकेश नाराज झाला कारण त्याने त्याच्या जीस्पा मधल्या मित्राला आमच्यासाठी जागा ठेवायला सांगून ठेवले होते. पण जीस्पामध्ये वैद्यकीय मदत कितपत मिळेल याबाबत मी साशंक होते त्यामुळे Keylong seemed better option. 

ज्या हॉटेलमध्ये जेवलो त्यांनीच जागा उपलब्ध करून दिली, पाच हि जणी २ वेगळ्या पण कनेक्टेड खोल्या मध्ये राहणार होतो. इथे देखील मॅडम तडक खोलीत जाऊन बसल्या व त्यांचे सामान आम्ही पोचवावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण मी अजिबात कॉपरेशन च्या मूड मध्ये नव्हते. मी त्या बॅग्स कडे ढुंकूनही बघितले नाही. इथे देखिल रेश्मा त्यांचे सामान घेऊन खोलीत घेऊन आली. 

आम्ही जिस्पापर्यंत जाऊ मग राकेश पण त्याच्या मित्राला भेटेल असे त्याला वाटत होते पण तो प्लॅन मी हाणून पाडला होता मग बहुदा मनात तो म्हणाला मला जायचेय तर मी जातो तुम्ही बसा इकडेच, सकाळी येतो घ्यायला. पण माझ्याशी  बोलता या मुलींना सकाळी येतो इतकंच सांगुन तो निघुन गेला होता. त्याला पैसे दिले नव्हते त्यामुळे आता तो आणखी काय चमत्कार दाखवतोय हा एक विचार मनात चमकला होताच. And I wasn't expecting this! मग त्याला फोन केला तर म्हणाला मला तिकडची रूम काही आवडली नाही आणि मला मित्राला भेटायचंय! कपाळावर हात मारला आणि प्रचंड patience ठेऊन सकाळी 630 ला ये असे सांगून त्याचा निरोप घेतला.
गुंजन खरेदी करताना 

समुद्र सपाटीपासून केलॉंग ३००० मीटर च्या वर आहे, म्हणजे officially high altitude. इथे पोचल्यावर acclimitate होण्यासाठी काही नियम पाळावेच लागतात. त्यानुसार मुलींना मी थोडा आराम करू दिला पण झोपू दिले नाही. मॅडम सगळे आपल्याच तंत्राने करायला पहात होत्या, खोलीत गेल्यावर झोपल्या त्या गाढच.  साडे चार नंतर आम्ही केलॉंगचे पिटुकले गाव बघायला बाहेर पडलो. बाजूच्या एका कॅफे मध्ये कॉफी, लेमन टी, मोमोज असा टाईमपास करून आम्ही उगाच विंडो शॉपिंग करत फिरत होतो. लडाख मध्ये फक्त BSNL आणि जिओ चे पोस्टपेड नंबर चालतात पण इथे आज सगळयांचे फोन चालू होते. त्यामुळे फोनवर देखील गप्पा चालू होत्या. अचानक रेश्माला कोणाचा तरी फोन आला आणि पोरगी अदृश्य झाली, मला वाटले संदीप ने कॉल केला असेल तर रेश्मा मॅडमच्या खिदमतीला गेली होती. पुढे होणाऱ्या नाटकाची नांदी झाली होती!

संध्याकाळी कॉफी